तब्बल अडीच महिन्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी लावली सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी

मुंबई : जवळपास अडीच महिन्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. वर्षा या निवासस्थानातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले. आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना हात दाखवला ,यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गळ्याभोवती पट्टा होता. मुख्यमंत्री यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे देखील गाडीत होते.

१२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय बैठकांना प्रत्यक्षपणे अनुपस्थित राहत असल्याने भाजपने टीकाही केली होती.