‘भारत जोडो यात्रा’ संपल्यावर भाजपची ‘अंतिम यात्रा’ सुरु होईल –  कॉंग्रेस 

पणजी – काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता होताच भाजपची ‘अंतिम यात्रा’ सुरू होणार आहे. घाबरलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाखेवर द्वेषाचे धडे घेतले आहेत. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात आणि गोवा मुक्ती लढ्यात काँग्रेस पक्षाचे योगदान समजून घेण्यासाठी त्यांनी भारताचा इतिहास शिकला पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने १९४७ मध्ये भारत जोडो यात्रा काढायला हवी होती, ज्यामुळे गोवा लवकर मुक्त होण्यास मदत झाली असती , असे  कर्नाटकातील उडुपी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी इतिहासाचे कमी ज्ञान असलेला मुख्यमंत्री असा टोला हाणत डॉ. प्रमोद सावंतावर पलटवार केला आहे.

१९७३ मध्ये जन्मलेल्या आणि द्वेष, जातीय संघर्ष आणि फुटीरतावादी राजकारणाचे धडे घेत शाखांवर आपला वेळ घालवलेल्या व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता, असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा चे वेड लागले आहे. या सर्वाचा पाया एम ए इन एंटायर पोलिटीकल सायन्स अशी अद्भूत पदवी प्राप्त केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुमला राज अंतर्गत फेक इन इंडिया मिशनवर आधारित आहे असा टोला अमित पाटकर यांनी हाणला आहे.

मी मुख्यमंत्र्यांना महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग पंडित नेहरूंचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि स्वातंत्र्य चळवळ आणि गोवा मुक्तीवरील इतर पुस्तके वाचण्याचा सल्ला देतो. यामुळे त्यांना इतिहासाचे खरे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल आणि  अज्ञान प्रदर्शीत केल्याने जाणारी लाज वाचवता येईल, असे अमित पाटकर म्हणाले.

आमचे नेते राहुल गांधी भारत एकसंघ राखण्यासाठी चालत आहेत आणि सांप्रदायिक सद्भाव, शांतता आणि एकतेचा संदेश देत आहेत. ऐतिहासीक भारत जोडो यात्रेत दररोज लाखो लोक सामील होत आहेत. भारत जोडो यात्रा  भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन अमित पाटकर यांनी केले.