सत्यपाल मलिकांच्या आरोपांनंतर कॉंग्रेसला मिळाली संधी; मोदी सरकारला घेरण्यासाठी उचलणार ‘हे’ पाऊल

मुंबई – पुलवामा (Pulwama) घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Governor Satya Pal Malik) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात काँग्रेस (Congress) रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, बॅनरखाली उद्या सोमवारी १७ एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहे, अशी माहिती महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Ptole) यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पुलवामा घटनेने सारा देश हादरला होता. सीआरपीएफच्या (CRPF) ४० जवानांना स्फोटाने उडवून देण्यात आले. एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? या स्फोटात ३०० किलो RDX वापरण्यात आले. ते कुठून आले? जवानांना विमानसेवा का पुरवली नाही? गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? पुलवामा घटना ही सरकारची चुक आहे, असे सत्यपाल मलिकांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने दिलेली नाहीत. या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील. पुलवामा घटनेवर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारची झोप उडवल्याने या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता त्यांच्या षडयंत्राला बळी पडणार नाही.

सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात एका मुलाखतीत उपस्थितीत केलेले प्रश्न अत्यंत गंभीर व देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. पुलवामा घटनेचे सत्य बाहेर यावे यासाठी सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस शर्म करो मोदी, शर्म करो, आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल, विभागचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे पटोले म्हणाले.