शरद पवारांपाठोपाठ संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी; राज्यात नेमकं चाललंय काय ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, हि घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.खासदार राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे समोर आले आहे.

संजय राऊत यांना ८ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास धमकी आली. ही धमकी सुनील राऊत यांच्या फोनवर आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत आहे. त्याने संजय राऊत यांना सकाळी ९ चा भोंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अन्यथा त्यांना गोळी मारु, अशी धमकी दिली आहे.

महिन्याभरात दोन्ही भावांना गोळी मारुन स्मशानात पोहचवणार असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.सुनील राऊत यांनी यासंदर्भातील ऑडियो क्लिप मुंबई पोलिसांना दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना एकाच दिवसांत जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे खळबळ माजली आहे.