पंजाबच्या विजयानंतर आता आम आदमी पक्षाच्या नजरा आता ‘या’ राज्यावर

नवी दिल्ली – पंजाबमध्ये आपल्या दणदणीत विजयानंतर, आम आदमी पक्षाने (आप) शेजारच्या हिमाचल प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंदित करण्याचे ठरवले आहे. News18 च्या वृत्तानुसार, हिमाचलमध्ये निवडणुकीतील प्रवेश वाढवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून आम आदमी पक्ष पुढील महिन्यात शिमल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवणार आहे.

आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना उद्धृत केले की, आमच्याकडे 68 विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येक मतदारसंघात पक्षाची स्थापना आधीच आहे आणि आता आम्ही पक्षाला त्याठिकाणी आणखी मजबूत करू.हिमाचलच्या मतदारांसमोर ‘दिल्ली मॉडेल’ आणि पंजाबमध्ये त्यांच्या सरकारकडून होणारी विकासकामे ही पक्षाची मुख्य रणनीती असेल, असे जैन म्हणाले.

सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडत जैन म्हणाले, जर तुम्ही लोकांना पाणी, वीज या मूलभूत सुविधा देऊ शकत नसाल, तर कर कशासाठी? हा कर राजकारण्यांसाठी आहे की सर्वसामान्यांच्या हितासाठी? जैन 18 मार्च रोजी शिमला येथे पोहोचतील, जिथे ते AAP साठी नवीन सदस्यत्व मोहीम सुरू करतील आणि पंजाबमधील निवडणुकीतील यश साजरे करण्यासाठी विजयी मिरवणुकीत सामील होतील.