सातारा : अस्मानी संकट आणि कोरोना महामारी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकरी राजाच्या मदतीला पुन्हा एकदा अजिंक्यतारा धावून आला. गतवर्षी प्रमाणे यंदाही अजिंक्यतारा साखर कारखान्याने एफआरपीनुसार होणाऱ्या उसाचे १०० टक्के बिल वेळेत अदा केले असून एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देणारा ‘अजिंक्यतारा’ जिल्ह्यातीलच नव्हे तर बहुदा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
कारखाना व्यवस्थापनाच्या काटकसरीच्या, सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम अदा केली असून एफआरपीनुसार सर्व रक्कम वेळेत देणारा कारखाना असा बहुमान अजिंक्यतारा कारखान्याने सलग दुसऱ्या वर्षीही मिळवला आहे. दरम्यान, आर्थिक मंदी आणि खरीप हंगामाची सुरुवात अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला अजिंक्यतारा कारखान्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून कारखान्याने हंमागातील उर्वरित तीसरा (प्रतिटन २४३ रुपये) हप्ताही शेतकऱ्याला खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याने या गळीत हंगामात शासन निर्धारित एफआरपी सूत्रानुसार गाळपासाठी आलेल्या उसाला ३०४३ रुपये प्रतिटन असा उच्चांकी ऊसदर दिला. कारखान्याने या हंगामात ७,३१६६९.६५७ मे. टन उसाचे गाळप करून १२.८२ टक्के अशा विक्रमी साखर उताऱ्याने ८७२५६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गाळपास आलेल्या उसाला २६०० रुपये प्रतिटन पहिला आणि त्यानंतर २०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता वेळेत अदा करण्यात आला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे आणि संचालक मंडळाने योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून गाळपास आलेल्या उसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम म्हणजेच २४३ रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण १७.७८ कोटी रक्कम दि. २७ सप्टेंबर रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. रक्कम मिळणेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
शेतकऱ्यांना ३०४३ प्रतिटन एफआरपीनुसार एकूण २२२.६४ कोटी ही संपूर्ण रक्कम वेळेत अदा करणारा अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीनुसार कारखान्याने संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली होती. यंदाही कारखान्याने वेळेत संपूर्ण पेमेंट अदा करण्याची परंपरा कायम राखली आहे. संचालक मंडळाने नेटके आर्थिक नियोजन करून कोणतेही देणे थकीत न ठेवता १०० टक्के एफआरपीची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट एफआरपीच्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे विहित मुदतीत अदा करून कारखान्याने शेतकऱ्यांच्याप्रती असलेले उत्तरदायित्व कायदेशीररित्या पूर्ण केले, याचे संचालक मंडळास मनस्वी समाधान आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केले.
हे वाचलंत का ?