प्रभाकर देशमुख हेच माण-खटावसाठी योग्य – अजित पवार

दहिवडी : प्रभाकर देशमुख हेच माण-खटावसाठी योग्य नेतृत्व आहे. त्यामुळे फक्त टाळ्या वाजवू नका तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली घड्याळाच्या चिन्हावर जे उभे राहतील त्यांना निवडून देण्याचं काम करा असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दिवड (ता. माण) येथे आयोजित ग्रामीण विकास व सहकार या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी हा सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेवून जाणारा पक्ष आहे. शरद पवारांच्या विचाराचे प्रभाकर देशमुख यांचे चांगले नेतृत्व स्विकारा. जो ऐकणार नाही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. तुम्ही राष्ट्रवादीचा आमदार केला असता तर अनेक प्रश्न सुटले असते. सर्व सरपंच, सदस्यांना माझे सांगणे आहे की इकडून तिकडे उड्या मारु नका. सरपंचांनी फक्त कडक राहू नका तर तुम्हाला मिळणारा निधी चांगल्या कामाला खर्च करा.

प्रभाकर देशमुख म्हणाले, मागील निवडणुकीत शरीराने बरोबर पण मनाने दुसरीकडेच अशा काही लोकांमुळे अपयश आले. पण खचून न जाता शरद पवार साहेब व अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दृष्टी ठेवून काम करत आहे. माण-खटावला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुमच्या सर्वांची भक्कम साथ आवश्यक आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी सोबत आला असून तो राजकीय व सामाजिक परिवर्तन करण्यासाठी उत्सुक आहे.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पोपटराव पवार, शहाजी क्षीरसागर आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यासोबतच नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.