मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई – मुंबईवरील २६/११ ( २००८ ) च्या दहशतवादी हल्ल्यावेळी शहराचे रक्षण, नागरिकांचा जीव वाचवताना मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक, अग्निशमन, सर्वच सुरक्षा दलांच्या अधिकारी, जवानांनी असामान्य धैर्य, शौर्य, पराक्रमाचे दर्शन घडवले. सामान्य मुंबईकरांनीही हल्ल्याचा निर्धाराने सामना केला. संयम पाळला. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. आत्मघातकी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची ऐतिहासिक कामगिरी घडली. २६/११ च्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांच्या त्यागाला, शौर्याला, देशभक्तीला तोड नाही. प्रत्येक भारतवासी या शहीदवीरांच्या त्यागाबद्दल कृतज्ञ राहिल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पोलिसांनी, सुरक्षा दलांनी बजावलेली कामगिरी हा देशाचा गौरवशाली इतिहास आहे. मुंबईच्या रक्षणासाठी पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान त्यावेळी स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून कसाबसारखा आत्मघातकी दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशरक्षणासाठी बजावलेले कर्तव्य, केलेला त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहिल. मुंबई पोलिसांचे हौतात्म्य भावी पिढीला देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील असेही सांगितले.

दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, ताजमहल व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या कामगिरीचे स्मरण करुन त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.राज्य पोलिसांनी ‘कोरोना’काळात बजावलेल्या कामगिरीचे कौतुकही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचे पोलिस दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या संदर्भात जागतिक तोडीचे असेल. पोलिसांचे मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी मिळून प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.