पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दर्जाबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक

मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत सांशकता आहे. अनेक ठिकाणी रस्ते निकृष्ट पध्दतीने बनविले जातात, त्यामुळे ते काही कालावधीतच खराब होतात. जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे, त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दर्जा सुधारण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केली.

पूर्वी राज्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे केली जात होती, ती कामे अत्यंत दर्जेदार पध्दतीने करण्यात आलेली होती. त्यामुळे ते रस्ते अनेक वर्षे चांगल्या स्थितीत राहत होते. मात्र गेल्या काही वर्षात राज्यात सुरु असणाऱ्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. त्यामुळे हे रस्ते एका-दोन पावसातच खराब होऊन जातात, त्याच्यावर मोठमोठे खड्डे पडतात. अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो. तरी राज्यात सुरु असणाऱ्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची सूचनाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.