आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या गोष्टीत शंभर टक्के तथ्य…; जाणून घ्या अजित पवार नेमकं काय म्हणाले

प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही

मुंबई – आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई मनपातील रस्ता गैरप्रकारांबाबत ज्या बर्‍याच गोष्टी सांगितल्या त्यात शंभर टक्के तथ्य आहे. मुंबईवर प्रशासक आहे. प्रशासक व नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे याचे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यावर आयुक्त आणि त्यांच्या टीमचे काय म्हणणे आहे हे राज्याला व मुंबईकरांना कळले पाहिजे अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या रस्ता गैरप्रकारांबाबत पत्रकारांनीही खोलात जाऊन माहिती घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले. मुंबईत रस्त्यांची जी कामे सुरू आहेत त्यामध्ये परकिलोमीटर काय खर्च येतो हे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे आणि मलाही त्याबद्दल माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी जो परकिलोमीटर १७ कोटी रुपये खर्च येतो हे सांगितले परंतु एवढा परकिलोमीटर खर्च येत नाही. मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे. यामध्ये सर्व्हिस देणार्‍या ४० प्रकारच्या बाबी आहेत. त्या जमिनीखालून चालतात त्यामुळे ताबडतोब कामे होऊ शकणार नाहीत त्याला काही काळ लागणार आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प मागच्यावर्षी झाला मग अर्थसंकल्प झाला असताना इतके कोटी रुपये कुठून आणणार आहात. कट कुठे लावला हे कळायला मार्ग नाही. सरकारमध्ये आलोय म्हणून घिसाडघाईने सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीट करणार हे ऐकायला कानाला फार बरं वाटतं त्यात मिडियाला सांगायला पण चांगलं वाटतं परंतु ते खरंच शक्य आहे का? एकंदरीत भौगोलिक परिस्थिती बघता त्याची अंमलबजावणी होऊ शकते का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारने आत्मचिंतन व आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. आदरणीय शरद पवारसाहेबांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी स्पष्ट केले.