‘महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यासाठी सरकारने एक कायदा करावा’

मुंबई  – आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या समस्या असतील या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

बागेश्वर बाबा कोण आहे. त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्यसरकारने कारवाई करावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.

बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत बोलताना आपण लोकशाहीत काम करतो. आपला भारत खंडप्राय देशात लोकशाहीला फार मोठे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान, घटना कायदा दिला आहे. त्या घटना, कायद्यात, संविधानाच्या चौकटीमध्ये बसणार्‍या ज्या बाबी असतील त्या मिडियाने दाखवल्या पाहिजेत. त्या मिडियाने वृत्तपत्रात छापल्या पाहिजेत, लेख पण लिहिले पाहिजेत आणि ज्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्यातून धर्मा-धर्मात तेढ निर्माण होणार आहे, जातीयद्वेष निर्माण होणार आहे, समासमाजात दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत आणि अठरापगड जाती असणाऱ्या तुमच्या – माझ्या भारतामध्ये या सगळ्यांचा आदर केला पाहिजे आणि आपल्या सगळ्या महापुरुषांनी याबद्दलचं स्पष्ट मत त्यांच्या – त्यांच्या काळात व्यक्त केले आहे आज आपण इतिहासात वाचतो आणि त्याच विचारांचे अनुकरण करुन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत असतो असेही अजित पवार म्हणाले.

हिंडेनबर्ग व अदानीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना यावर देशपातळीवर चर्चा करायला लागले आहेत. ज्या परदेशी कंपनीने आरोप केला त्यांचे म्हणणे वाचले. ज्यांच्या विरोधात आले होते त्या अदानी ग्रुपने देखील त्यांचे म्हणणे मांडले आहे हेही बघत आहोत. ज्यावेळी या दोन गोष्टी होत आहेत एक परदेशी कंपनी आणि आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती यामध्ये घडत असताना केंद्रसरकारच्या वित्तविभागाने हस्तक्षेप केला पाहिजे. मोठमोठ्या बँकांच्या बातम्या आल्यानंतर वित्तविभागाने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि लोकांनी घाबरून जाऊ नये असे पत्रक काढले व योग्य अयोग्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तशाप्रकारे अशी घटना घडत असताना का कुणीच बोलायला तयार नाही. केंद्रसरकारच्या महत्त्वाच्या यंत्रणा गप्प का आहेत. हे देशातील सव्वाशे कोटी जनतेला हे लक्षात आणून दिले पाहिजे. याबाबतच्या वस्तुस्थितीचा परिपूर्ण अभ्यास केंद्रसरकारचा झाला असेल तर जनतेसमोर क्लीअर करावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.