राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासात भूविकास बँकेचे मोलाचे योगदान – अजित पवार

पुणे – राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासात भूविकास बँकेचे योगदान मोलाचे आहे. आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेली, आपण सर्वांनी वाढवलेली, भूविकास बँक अवसायनात निघाल्याने बंद करावी, लागली याचे निश्चितच दु:ख आहे. मात्र शेतकऱ्यांसह भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद अशी संमिश्र अवस्था आहे. त्यामुळे एका डोळ्यात आसू, तर, दुसऱ्या डोळ्यात हसू असल्याची भावनिक प्रतिक्रीया व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार  (Ajit Pawar) यांनी भूविकास बँकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कायमच सकारात्मक भूमिका घेतली, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

पुणे येथील अल्पबचत भवनमध्ये भूविकास बँक अवसायनात निघाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि बँक कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी देण्याचा निर्णय घेऊन, निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सत्कार शेतकरी व भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आला.

यावेळी आयोजित ‘कृतज्ञता मेळाव्या’त सत्काराला उत्तर देताना विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, सुनील साळवी, नरेंद्र सावंत, नितीन खोडदे, एम. पी. पाटील, आनंद थलवर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच माझ्या राजकीय, सामाजिक जीवनाची सुरुवात झाली, त्यामुळे सहकार क्षेत्रातल्या अडचणींची मला माहिती आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांनी, म्हणजे १९६५ ला स्थापन झालेल्या भूविकास बँकेने जवळपास ४५ वर्षे चांगला कारभार केला. राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. दुर्दैवाने , आर्थिक संस्था चालवण्यासाठी जी व्यावहारिक समज आणि आर्थिक चातूर्य लागते, तिथे बँक कमी पडली. शेतकऱ्यांचा विकास हे भूविकास बँकेचे ध्येय असले तरी, ते गाठण्यासाठी आर्थिक गणिते सांभाळावी लागतात. नफा कमावणे हा उद्देश दुय्यम ठेवल्याने बँकेला फटका बसला. अशा अनेक कारणांमुळे १९९८ पासून बँकेला कर्जवितरण बंद करावे लागले. साधारण दहा वर्षांपूर्वी बँक अवसायानात निघाली. तेव्हापासून बँकेचे कर्जदार शेतकरी, बँकेचे कर्मचारी बांधव अडचणींचा सामना करत होते. शेतकऱ्यांच्या विकासात महत्वाचे योगदान असलेली, राज्याची भूविकास बँक अवसायानात निघणे, हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत वाईट आणि दु:खद अनुभव होता. तेव्हापासून आतापर्यंचा काळ आपल्या सर्वांसाठी कठीण होता असेही अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद माझ्याकडे आले. भूविकास बँकेच्या कामाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडला गेल्याने, तसेच, सहकार, बँकिंग क्षेत्रात काम करत असल्यामुळे, यासंदर्भातला निर्णय घेणे सोपे आणि शक्य झाले. गेल्या वर्षीचा, २०२२ – २३ च्या राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. त्यावेळी अर्थसंकल्पातच, राज्यातल्या, ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांकडे असलेले , भूविकास बँकांचे , ९६४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज, माफ करण्याची घोषणा आपण केली. बँक कर्मचाऱ्यांची  २७५ कोटींची थकबाकी एकरकमी देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या अर्थसंकल्पातच हा निर्णय घेतल्याने आणि विधीमंडळात अर्थसंकल्प मंजूर करुन घेतला असल्याने, निधीची तरतूदही असल्याने, नंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली. भूविकास बँकेसंदर्भात हा निर्णय पूर्ण अभ्यास करुन अर्थसंकल्पात घोषणा करण्यापूर्वी मंत्रालयात अनेकदा बैठका घेऊन कशा पद्धतीने मार्ग काढता येऊ शकतो, याचा विचार, त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धवजी, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आम्ही सगळ्यांनी केला. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची , अधिकाऱ्यांची मते घेतली. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून, अर्थसंकल्पात हा निर्णय जाहीर केला. त्याआधीही ऑगस्ट २०२१ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाचे सुतोवाच आपण केले होते. भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्याचा निर्णयही त्यावेळी आपण घेतला. त्याचाही फायदा राज्याच्या विकासासाठी होणार आहे.

भूविकास बँकेचा प्रश्न सोडविल्यामुळे राज्यातल्या ३५  हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला तसेच भूविकास बँकेच्या अडीच हजार कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यात येणार आहेत. मात्र आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेली, आपण सर्वांनी वाढवलेली, भूविकास बँक अवसायनात निघाल्याने बंद करावी, लागली याचेही दु:ख मनात आहे. बँक पडल्याचे दु:ख, शेतकऱ्यांचे-तुमचे प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद अशी संमिश्र अवस्था आपल्या सर्वांचीच आहे. एका डोळ्यात आसू, तर, दुसऱ्या डोळ्यात हसू, ठेवून, आपण केलेला हा सत्कार स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.