पहाटेच्या शपथविधीवर मी कधीही बोलणार नाही, अजित पवारांचा निर्धार 

Ajit Pawar  : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या घटनेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या तसेच पवारांच्या भूमिकेबाबत देखील उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. यानंतर बढाई मारण्याच्या नादात आपल्याच नेत्याला अडचणीत आणल्याचे लक्षात आल्यानंतर आता जयंत पाटील यांची दुसरी प्रतिक्रिया आली असून आता मात्र त्यांनी सारवासारव केली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.  त्यावेळी मी स्वत: म्हटलेलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. तसंच आपण उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.