लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांकडून सहकार्य न मिळाल्यास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील- पवार 

पुणे – कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांकडून सहकार्य न मिळाल्यास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिला.

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अजूनही सुमारे 38 ते 40 टक्के लोकांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. प्रशासनाकडून लसीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत पण नागरिकांकडून त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, प्रसंगी संपूर्ण लसीकरणासाठी काही निर्बंधही आणावे लागतील असा इशारा पवार यांनी दिला. पुण्यातील विधान भवन इथं आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते.

‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या अंतर्गत गेल्या आठवड्यात लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यात सातत्य राहील असा प्रयत्न करावा. विशेषत: कमी लसीकरण झालेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाच्या नवीन विषाणूला तोंड देण्यास प्रशासन सज्ज असून जिल्ह्यातील 7 पैकी 5 नवे रुग्ण बरे झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. बुस्टर मात्रा देण्याविषयी आपलं मत व्यक्त करताना पवार म्हणाले की, सर्वप्रथम दोन्ही मात्रा कशा देता येतील या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. बुस्टरची मात्रा देण्याचा निर्णय देश पातळीवर घेण्यात येईल, त्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं.