…तोपर्यंत कोणालाही पक्षात प्रवेश देऊ नका, अजित पवारांचे आदेश

पुणे : राज्यात महापालिका निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यके पक्षाने आपल्या पक्षवाढीवर भर देण्यास सुरवात केली आहे. प्रभाग रचना जाहीर झाली असली तरी देखील त्यावर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे प्रभागात काम करणाऱ्या इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील प्रवेशावर तूर्तास ब्रेक लावला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकतेच भाजपचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत पक्ष प्रवेश नको अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांना वेट अँण्ड वॉच करावं लागणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पक्षात प्रवेश देऊ नये असे आदेश अजित पवार यांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘आझाद मराठी’ला दिली आहे. तेव्हा आता इतर पक्षातील काठावर असणाऱ्या नेत्यांची मात्र गोची झाल्याचे चित्र आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे अनेक नेते आणि विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय पण आता अजित पवारांच्या या भूमिकेमुळे इतर पक्षातील आजी, माजी, आणि भावींना प्रवेश देणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसमोर दिलेला शब्द कसा पाळायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.