शिंदे एवढेच कर्तृत्त्ववान होते तर तुमच्या मंत्रिमंडळात एकच खातं का दिलं ? अजितदादांचा फडणवीसांना सवाल 

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपने (BJP) एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, देवेंद्रजी, मी तुमचं भाषण बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदे यांचं इतकं समर्थन केलंत. एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा तुम्ही त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ दिले होते. एकनाथ शिंदे एवढे कर्तृत्त्ववान होते तर त्यांना फडणवीसांनी एकच खाते का दिले? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला .

नेता मोठा असला, त्याचं वजन जास्त असलं की, त्यांच्याकडे जास्त खाती असतात हे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)आणि सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांना माहिती असेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, नियोजन, महसूल, वन, कृषी आणि सहकार इतक्या खात्यांचा कारभार होता. जर राज्याचे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढेच सर्वगुणसंपन् होते तर मग त्यावेळी तुम्ही त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ का दिले? या खात्याचा जनतेशी थोडाही संबंध नव्हता. फक्त रस्ते आणि बोगदे बांधायेच, हेच त्यांचे काम होते. या सगळ्या गोष्टींवर विचार झाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.