अजित पवार म्हणतात पुन्हा पालकमंत्री म्हणून बसणारच आहे, चंद्रकांत पाटलांनी मारला अस्सल पुणेरी टोमणा 

पुणे : महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर बसले त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या कालवा सल्लागार समितीची पहिलीच बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्या अनुपस्थितीचीच अधिक चर्चा होत असायची. मात्र आज नव्या पालकमंत्र्यांच्या पहिल्याच कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार हे अर्धा तास आधीच उपस्थित होते. पुणे शहराबरोबर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचाही फैसला होणार असल्याने अजित पवार आवर्जून बैठकीच्या आधीच उपस्थित होते.

मात्र यावेळी अजित पवार यांना ‘तुम्ही पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील गैरहजर राहत असत मात्र आज तुम्ही आधीच उपस्थित राहिलात?’ असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले,  ज्या वेळेस लोक आपल्याला सांगतील विरोधी पक्षात काम करायचं तेव्हा आपण करायचं, जेव्हा लोक सांगितलं सत्ताधारी मंत्री म्हणून काम करायचं तेव्हा पालकमंत्री म्हणून परत बसणारच आहे. असं म्हणत अजित पवारांनी आपणच पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचं ठासून सांगितलं आहे.

आता माजी पालकमंत्री अजित पवार बोलले म्हंटल्यावर आजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या शैलीत प्रत्युत्तर देणार नाहीत असं होणं जरा कठीणच. याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांना छेडलं असता ते म्हणाले,  अजित पवारांनी आपण पालकमंत्री होणार असल्याचे म्हंटलंय पण कोणाचे ते नाही ना सांगितलं ? असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तर, आम्ही दोघांनी आधी येऊन बैठकीची सर्व तयारी केली त्यामुळे पटपट बैठक संपवता आली अस देखील पाटील म्हणाले.