राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांच्या निवडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे. तसेच राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मात्र अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. आता अजित पवारांनी (Ajit Pawar) या घोषणेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीट करत अजित पवार यांनी लिहिले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.’

‘आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!’, असे अजित पवार म्हणाले.