पराभव जिव्हारी लागलाय, नक्की काय गडबड झाली हे पाहतोच – अजित पवार

पुणे : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे ज्या जागेसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपाटले होते. या जागेवरून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदीप कंद विजयी झाले आहेत. प्रदीप कंद हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते होते होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे . त्यामुळेच अजित पवारांनी हि जागा प्रतिष्ठेची बनवली होती.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीमधून 52 मतं मिळाली आहेत.

या पराभवावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बारामतीत भाजपचा प्रदीप कंद निवडून आला आहे. मला तिथं डाउट होताच पण त्या एका ठिकाणी आम्ही का कमी पडलो याची बारकाईने माहिती घेणार आहे. नक्की काय गडबड झाली हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे.’ असं अजित पवार म्हणाले आहेत.