बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही – पाटील

मुंबई – एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

बारामतीमधील (Baramati) जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार (Supriya Sule, Ajit Pawar) यांना मिळतेच. बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपने टार्गेट केली आहे शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे. असं वातावरण तयार करायचं की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय अशी भाजपची मिडियासमोर जाण्याच्या पध्दती आहेत. मात्र थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडेन त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला (BJP) आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते… ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणं त्यांना शोभत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.