‘जावेद हबीबचे सर्व सलून 48 तासांत बंद करा नाहीतर…’

इंदौर – थुंकून केस कापल्याप्रकरणी प्रसिद्ध ब्युटीशियन आणि हेअर डिझायनर जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात पीडित महिला पूजा गुप्ताने जावेद हबीबविरुद्ध कलम ३५५, ५०४ आयपीसी, ३ महामारी कायदा आणि ५६ आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, आता या प्रकरणी महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. जावेद हबीब यांना आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही करण्यात आली होती. महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत पत्र पाठविले आहे.

दरम्यान, इंदूरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय (bjp mla Akash Vijayvargiya) यांनी इंदूरमध्ये जावेद हबीब चालवणारे सर्व सलून ४८ तासांच्या आत बंद करण्याचा इशारा दिला. असे न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जिल्हाधिकारी मनीष सिंह, आयुक्त प्रतिभा पाल, पोलीस आयुक्त हरी नारायणचारी मिश्रा, मनीष कपुरिया या इंदूरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विजयवर्गीय यांनी निवेदन दिले आहे.

यात ते म्हणतात, अलीकडेच मी जावेद हबीब यांचा व्हिडिओ पाहिला. ज्यात त्यांनी एका महिलेला स्टेजवर आमंत्रित केले आणि केशरचना करताना तिच्या डोक्यावर थुंकले. मी याचा तीव्र विरोध करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की, किमान इंदूरमध्ये तरी जावेद हबीबच्या नावाने चालणाऱ्या सर्व संस्था ४८ तासांच्या आत बंद कराव्यात. इंदूरमध्ये आम्ही त्यांच्या संस्था चालू देणार नाही अशी प्रतिज्ञा यावेळी त्यांनी घेतली.