‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी रणबीर कपूर-आलिया भट्टचा निषेध, महाकाल मंदिरात जाण्यापासून रोखले

उज्जैन – आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor) मंगळवारी बाबा महाकालच्या दर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन (Mahakal Temple Ujjain) येथील महाकाल मंदिरात पोहोचले होते. मात्र मंदिरात प्रवेश करताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे (Bajrang Dal and Vishwa Hindu Parishad) कार्यकर्ते रणबीरच्या या वक्तव्यामुळे मंदिर प्रवेशाला विरोध करत होते. रणबीरने आपल्या एका वक्तव्यात ‘बीफ’ (Beef) खाण्याबाबत सांगितले होते. रणबीर आणि आलियाला विरोध करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उज्जैनचे पोलीस अधिकारी ओम प्रकाश मिश्रा (Om Prakash Mishra) यांनी एएनआयला (ANI) सांगितले की, “काही व्हीआयपी महाकालेश्वर मंदिराला भेट देणार असल्याने आम्ही व्यवस्था करत होतो. यादरम्यान काही लोक त्याच्या निषेधार्थ मंदिर परिसरात जमा होऊ लागले. आंदोलकांपैकी एकाने पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यानंतर आम्हाला लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांची गाडी आणि त्यांच्या संरक्षणात तैनात असलेले अधिकारी मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच. आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि चित्रपटाच्या टीमला काळे झेंडे दाखवले. जेव्हा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि काही निष्पन्न झाले नाही तेव्हा त्यांना लाठीमार करावा लागला. पण अयान मुखर्जीने मंदिराच्या गर्भगृहात बाबा महाकालचे दर्शन घेतले आणि प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला.

दरम्यान, अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, तो मुख्य कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत बाबा महाकालच्या दर्शनासाठी आला होता.