वारकरी बांधवांना साधनेसाठी सर्वतोपरी सहकार्य; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – आपल्याकडे समाजातील प्रत्येक घटक हा परमेश्वराच्या साधनेत सदैव मग्न असतो. वारीमध्ये अबाल वृद्धांसह तरुणांचा लक्षणीय सहभाग असतो. त्यामुळे परमेश्वराप्रतीच्या साधनेत सरवतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. कोथरूड मतदारसंघातील किष्किंधानगर येथील राजा शिवराय मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आणि स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या माध्यमातून २४ भजनी मंडळांना विणा प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ संदीप बुटाला, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या मनिषा बुटाला ,ह. भ. प. गणेश महाराज भगत, बजरंग शिंदे, स्वातीताई मोहोळ, चंद्रकांत धुमाळ, गणेश सावळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, आपल्या समाजातील प्रत्येक घटक हा अध्यात्माशी जोडला गेलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने परमेश्वराच्या साधनेत मग्न असतो. आषाढ महिना सुरु होताच सर्व वारकऱ्यांना ओढ लागते, ती पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनाची. त्यासाठी श्री क्षेत्र अळंदी आणि श्री क्षेत्र देहू यांसह माऊली आणि तुकोबारायांची पालखी निघते. अबाल-वृद्ध या वारीत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले असतात. विशेष करुन तरुणांचा सहभाग यात लक्षणीय असतो.

ते पुढे म्हणाले की, परमेश्वराची साधनेसाठी प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. गेल्या तीन वर्षात विविध वारकरी भजनी मंडळांना लोकसहभागातून भजनाचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहेच. भविष्यातही वारकरी बांधवांना त्यांच्या भजन साधनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही यावेळी दिली.

यावेळी पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, ते म्हणाले, की किष्किंदानगर मधील पोलीस स्टेशन हे पहिल्या मजल्यावरुन स्थलांतरित करावे, आणि सदर जागेत स्थानिक नागरिकांसाठी कार्यक्रमाचे व्यासपीठ म्हणून विकसीत करावे, अशी मागणी केली. त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मान्यता देत, लवकरच याचा पाठपुरावा करुन काम मार्गी लावण्याचे आश्वस्त केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह.भ.प. गणेश महाराज भगत यांचा निरुपण कार्यक्रम झाला. या निरुपण सेवेत नामदार पाटील यांनी भाग घेत विठ्ठलाचे नामस्मरण केले.