‘महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे’

मुंबई – शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली गेली आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील (Marine Drive) सरकारी निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईमुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ईडीने अनिल परब यांच्यासंबंधित कोणत्या सात ठिकाणांवर धाड टाकली आहे.

दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब (Anil Parab) यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. केंद्रातील भाजप सरकारने कितीही सूडाने कारवाई केली तरी आम्ही डगमगणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

अनिल परब आमचे सहकारी आहेत. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अनिल परब आणि आमच्या अन्य सहकाऱ्यांवर जे आरोप लावले जात आहेत, त्यापेक्षा गंभीर गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. अशा कारवायांमुळे सरकार पडणार नाही, तसेच सर्व निवडणुकाही सुरळीत पार पडतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

अशा कारवायांमुळे भाजपच खड्ड्यात जाईल. महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण कधी लागले नव्हते. तुमच्या हातात केंद्रीय तपासयंत्रणा आहेत म्हणून राज्यातील विरोधकांना नामोहरम करु, असे केंद्राला वाटत असेल तर तो समज चुकीचा आहे. शिवसेनेच मनोबल अशा कारवायांनी खच्ची होणार नाही. उलट अशा प्रत्येक कारवाईसोबत आमचे मनोबल वाढेल. आमच्याकडेही भाजपच्या नेत्यांविरोधात असंख्य पुरावे आहेत. आम्ही लवकरच टॉयलेट घोटाळ्यासह अन्य घोटाळा बाहेर काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.