वय नाही, कामगिरी पाहा! आयपीएल लिलावात ‘या’ १५ वर्षांच्या क्रिकेटरसाठी फ्रँचायझींमध्ये होणार रस्सीखेच

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) एक असा मंच आहे, जिथे क्रिकेटपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, हार्दिक पंड्या अशा बऱ्याच क्रिकेटपटूंना आयपीएलमुळे नवी ओळख मिळाली आहे. २३ डिसेंबरला कोची येथे आयपीएल २०२३ हंगामाचा लिलाव आयोजण्यात आला आहे, ज्यासाठी जवळपास ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक असे नाव आहे, ज्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

अल्लाह मोहम्मद गझनफर (Allah Mohammad Ghazanfar) असे या क्रिकेटपटूचे नाव असून त्याचे वय केवळ १५ वर्षे आहे. परंतु मुर्ती लहान पण किर्ती महान प्रमाणे गझनफरमध्ये प्रतिभा ठासून ठासून भरलेली आहे. अशात ही प्रतिभा दाखवण्यासाठी त्याला आयपीएलसारखा मंच मिळाल्यास लवकरच तो आपले नाव उंचावू शकेल.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

गझनफर अफगाणिस्तानचा असून आयपीएलच्या आगामी हंगामाच्या लिलावासाठी त्याची निवड झाली आहे. गझनफर हा ऑफ स्पिन गोलंदाज आहे. या खेळाडूकडे केवळ 3 टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. यावर्षी श्पेजिझा टी20 लीगमध्ये मिस झनक नाइट्सकडून खेळताना त्याने लक्षवेधी प्रदर्शन केले. गझनफरला तीन सामन्यांत संधी मिळाली आणि या खेळाडूने 5 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.22 प्रति षटक होता.

दुसऱ्या सामन्यातच गझनफरने आपली प्रतिभा सिद्ध केली होती. या ऑफस्पिनरने हिंदुकुश स्टार्सकडून खेळताना 4 षटकात केवळ 15 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या शानदार प्रदर्शनामुळे विरोधी संघ अवघ्या 104 धावांत आटोपला आणि गझनफरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. गझनफरची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची अचूक लाईन आणि लेंथ आहे. गझनफर ऑफ स्पिनर असला तरी पॉवरप्लेमध्ये तो गोलंदाजी करू शकतो. त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 7 धावांपेक्षा कमी आहे.

अलीकडेच, त्याने बिग बॅश लीगसाठी देखील त्याचे नाव दिले होते; परंतु त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मात्र, काही आयपीएल संघ गझनफरला नक्कीच खरेदी करू शकतात. गझनफरची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये आहे आणि अफगाणी फिरकीपटू आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करताना दिसले आहेत. राशिद खान, मुजीब उर रहमान यांच्याकडे पाहता, काही फ्रेंचायझी गझनफरवरही बोली लावू शकतात. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन हा गझनफरचा आदर्श आहे आणि जर या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर तो त्याच्या आदर्श क्रिकेटपटूलाही भेटू शकतो.