मध्य प्रदेशातील कॅथॉलिक शाळेत तोडफोड; धर्मांतराचे काम शाळेतून सुरु असल्याचा आरोप

विदिशा – मध्य प्रदेशातील एका कॅथॉलिक शाळेत तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आहे. डियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सोमवार 6 डिसेंबर रोजी दुपारी विदिशा जिल्ह्यातील गंज बासोदा तहसीलमधील एका कॅथोलिक शाळेमध्ये जमाव पोहोचला आणि त्यांनी दगडफेक करून तोडफोड करण्यास सुरुवात केली. तेथे धर्मांतराचे काम शाळेचे अधिकारी करतात, असे गोंधळ घालणाऱ्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी सेंट जोसेफ हायस्कूलच्या बाहेर सुमारे 300 लोक जमा झाले होते. त्यावेळी शाळेत बारावीची परीक्षा सुरू होती. परीक्षेच्या मध्यभागी निदर्शक जमावाने हिंसक वळण घेतले आणि शाळेच्या आवारात घुसून शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक अँथनी तिनूमकल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की,जमाव लोखंडी रॉड आणि दगडांनी सज्ज होता. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करताना ती ‘जय श्री राम’चा नाराही देत होती. आम्ही पोलिसांकडे संरक्षण मागितले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की जमाव फक्त काही घोषणा देईल आणि शांततेने निघून जाईल पण जमावाने तोडफोड केल्यावर पोलीस आले.

पोलिसांचे म्हणणे काय आहे?

गंज बासोदा तहसीलचे पोलीस अधिकारी भारत भूषण यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी वृत्तपत्राला सांगितले, ही निदर्शने शांततेत पार पडणार होती मात्र काही हल्लेखोरांनी संधीचा फायदा घेत शाळेच्या इमारतीवर दगडफेक करून तोडफोड केली. यावेळी शाळेच्या अधिकाऱ्यांना केवळ सुरक्षाच देण्यात आली नाही, तर बजरंग दलाच्या चार सदस्यांनाही तात्काळ कारवाई करून ताब्यात घेण्यात आले.

तोडफोड का?

या प्रश्नावर विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे की, 31 ऑक्टोबर रोजी शाळेत 8 हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात आले. तथापि, शाळेचे मुख्याध्यापक, तिनूमकल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की शाळेने 31 ऑक्टोबर रोजी आपल्या ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी पवित्र मेजवानी आयोजित केली होती. शालेय विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा आरोप खोटा असल्याचे दाखवण्यासाठी या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तिनमुकल म्हणाले की, त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी या शाळेत शिकत नाही. बातम्यांनुसार, या शाळेत सुमारे 1500 विद्यार्थी शिकतात, त्यापैकी बहुतांश हिंदू आहेत. दरम्यान,पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १४७, १४८ आणि ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.