गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील, पवारांनंतर राऊतांनीही केली भविष्यवाणी

sanjay -raut-also-hinted-at-mid-term-elections

मुंबई – शिंदे-फडणवीसांचं सरकार राज्यात आल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांचं हे सरकार सहा महिनेच टिकेल अशी भविष्यवाणी केली आहे. सोबतच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशा सूचना शरद पवारांनी (Sharad Pawar)  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्या आहेत.

ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे, असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील पवार यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

भाजपकडे 106 आमदार असतानाही दुय्यम भूमिका त्यांनी घेतली. हे सरकार चालेल असा भाजपला (BJP) विश्वास असता तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले असते. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपनं केली आहे. कदाचित मध्यावधी निवडणूका लागतील, गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपने 2019 ला अशी व्यवस्था केली असती तर महाविकास आघाडीच झाली नसती. पण त्यावेळीही भाजपने आम्हाला डावललं. शिवसेनेला फोडणं आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं हाच त्यांचा एकमेव हेतू आहे. गटनेतापद आणि व्हिपच्या मुद्द्यावर राऊत यांनी भाष्य केलं. पक्षविरोधी कारवाई केल्याने शरद यादव यांंचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आले. कायदा समान असेल तर एका ठिकाणी एक न्याय दुसऱ्या ठिकाणी दुसरा अन्याय का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. मी याला संसदीय लोकशाही मानत नाही. महाराष्ट्रातही हेच सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी निर्णय नवीन अध्यक्षांनी बदलला. पण यातून सामान्यांना काय मिळणार, असंही त्यांनी विचारलं.