संगीत कला असली, तरी तिला विज्ञानाची जोड आवश्यक – डॉ. प्रभा अत्रे

पुणे : “ व्यवसायाने मी गायिका असले, तरी विज्ञान आणि कायदा क्षेत्रातील पदवीधर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे विज्ञान आणि तर्क यांच्या दृष्टीकोनातून पाहायची मला सवय झाली आहे. माझे आई, वडील आणि गुरू मला ‘‘उघड्या डोळ्याने परंपरेकडे बघ आणि काम कर’’, असे नेहमी सांगत. परंपरेवर माझी खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे,’’ असे मत किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वरमयी गुरुकुल, शिवाजी नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘किराणा घराणा ग्रंथालय व संसाधन केंद्रा’चे औपचारिक उद्घाटन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ विकास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘संगीत कला विहार’ या मासिकाच्या डॉ. प्रभा अत्रे यांच्यावरील ‘स्वरयोगिनी’ या विशेषांकाचे गौरवार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, संगीत कला विहार मासिकाचे संपादक सुधाकर चव्हाण, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम.डी. व स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे उपस्थित होते. यावेळी डॉ. अत्रे यांनी उपस्थित पत्रकारांसोबत संवाद साधला. ‘स्वरयोगिनी’ हा विशेषांक हिन्दी भाषेत प्रकाशित करण्यात आला आहे.

डॉ. अत्रे म्हणाल्या, “ कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे, ते गेलंच पाहिजे किंवा विज्ञान युगात ते सिद्ध करता आले पाहिजे. काळाबरोबर कला बदलत असते आणि कलेबरोबर तिचे शास्त्र ही बदलायला हवे. शास्राने पुढच्या विकासाची वाट दाखवायची असते. राग मल्हार गावून पाऊस पडत असतो, किंवा दीपक राग गायल्याने दिवे लागतात, या कथांचा अर्थ एव्हढाच की, तुमचे सादरीकरण इतक्या वरच्या स्तराचे असले पाहिजे की पाऊस पडल्यासारखे, दिवे लागल्यासारखे वाटले पाहिजे. विज्ञान युगात कथांना दूर ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे स्वच्छ नजरेने पाहणे गरजेचे आहे. तरच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मिळवू शकू.’’ आज कलेचे जे प्रस्तुतीकरण होतंय , त्याने फक्त मनोरंजन होत आहे, आनंद सुद्धा होतोय. मात्र हे करताना सादरीकरणाचा स्तर कमी होणार नाही, याचे आपण भान ठेवले पाहिजे. टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रंथालयाचा उपयोग वाचनासाठी, ज्ञान वाढविण्यासाठी असतोच पण संशोधनासाठी ते अतिशय उपयुक्त ठरते. प्रत्येक विषयावर ग्रंथालय उपलब्ध झाली तर संशोधनाचे काम निश्चितच चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे. शाळा,महाविद्यायांमध्ये डॉक्युमेंटेशनची पद्धत यासंबधीचे शिक्षण देण्याची अत्यंत गरज आहे. याबाबतीत आपण फार उदासीन आहोत. डॉक्युमेंटेशन मुळे त्या काळाची सत्यपरिस्थिती आपल्याला समजते. त्याच्या जोरावरच पुढच्या शोधकार्याची वाट तयार होते. त्यामुळेच किराणा घराण्यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी स्वरमयी गुरुकुल येथे स्थापन ग्रंथालय उपयुक्त ठरेल, असेही डॉ. अत्रे यांनी सांगितले.

संगीत मैफिलींच्या स्वरूपाबाबत डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, “ मैफिलीच्या बदलत्या स्वरूपाला कलाकार, श्रोते आणि सरकार सर्वजण जबाबदार आहेत. एक-दोन तास बसून एखादा राग गायला, ऐकायला आवश्यक असलेला संयम आपल्याकडे नसतो. आलाप हे रागाचे मूळ गाभा आहे. त्यातून राग उमलतो, फुलतो. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. तो वेळ आज कलाकार, श्रोत्यांकडे नाहीये. सरकारचेही कार्यक्रमाचे काही नियम असतात. संगीतासाठी जी शांती लागते, ती आज नाहीये. संगीत शिक्षणाबाबत डॉ. अत्रे म्हणाल्या, “ आपल्याकडे श्रोत्यांचे शिक्षण हा प्रकार नाही. गाणे कसे ऐकायचे याची एक पद्धत असते, पण ती शिकवलीच जात नाही आपल्याकडे. केवळ संगीत नाही तर इतर सर्व कलांबाबत शाळा, महाविद्यालयांमधून सामान्य शिक्षण दिले गेले पाहिजे. आपल्या कला, कलाकार यांच्या विषयीची माहिती मुलांना दिली पाहिजे.’’

तरुण वर्गातील संगीत साधना या विषयावर प्रभाताई म्हणाल्या, “ तरुण वर्गाला सार शिकला नाही, तर लगेच स्टेजवर जायची इच्छा असते. संगीत शिकण्याचा जो आनंद घेतला पाहिजे, तो ते घेत नाही. त्यांना टीव्हीवरील रिएलिटी शो, रेडिओवर गाण्यासाठी संगीत शिकायचे असते. गाणे शिकायला एक महिना झाला नाही, की लगेच पालकांकडून आमची मुले कधी रेडिओ वर, कार्यक्रमात गाणार अशी विचारणा होत असते. जसे तुम्हाला डॉकटर , वकील होण्यासाठी वेळ लागतो, तसाच संगीत शिकण्यासाठी देखील लागतो. इथेही तपस्या, साधना करावी लागते, हे समजून घेतले पाहिजे.’’

आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण याबाबत डॉ. अत्रे म्हणाल्या, “ ठुमरी हा प्रकार मी कोणाकडे शिकले नाही, पण मी ती गायचे. गुलाम अली खान साहेब यांची ठुमरी मला खूप आवडायची. त्यांना भेटायची खूप इच्छा होती. एकदा हैद्राबाद येथील एका कार्यक्रमात ते गाणार होते, मी पण तिथे गेले होते. तेव्हा मी आयोजकांना सांगितले की मला खानसाहेबांना भेटायचे आहे. त्यांनी खानसाहेबांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, मी त्या मुलीचे नाव ऐकले आहे, जर ती मुलगी ठुमरी गाणार असेल, तरच मी तिला भेटेन. मी त्यांना भेटले, ठुमरी गावून दाखविली तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला, तो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता.”
ग्रंथालयाबाबत माहिती देताना प्रसाद भडसावळे म्हणाले, “ स्वरमयी गुरुकुल येथे स्थापन करण्यात आलेल्या या ग्रंथालयात किराणा घराणा संबंधित व्यक्तींची चरित्रे, लेख, सांगीतिक लेखन, माहिती, प्रबंध, संकल्पना, ध्वनिमुदिका, व्हिडीओज यांचा समावेश आहे. आजमितीला ग्रंथालयात २०० पुस्तके, १५० हून अधिक नियतकालिके, १० हून अधिक कलाकारांच्या प्रस्तुतीचा २० जीबींचा डाटा उपलब्ध आहे. या संग्रहात दिवसेंदिवस भर पडत जाईल असा आम्हाला विश्वास आहे. हे सर्व साहित्य अभ्यासकांना व जिज्ञासूंना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.’’

डॉ. विकास कशाळकर म्हणाले, “ किराणा घराणे हे गायकीमध्ये सर्वात लोकप्रिय घराणे आहे. या घराण्यात रागांमधल्या स्वरांवर सूक्ष्म अभ्यास झाला आहे. या घराण्यातील प्रत्येक गायक अतिशय चांगला जातो. अशाच घराण्यातील प्रभाताई यांचे गायन, त्यांचे योगदान अतुलनीय आहे. सरगमचा भावात्मक उपयोग करण्याचा पहिला प्रयोग प्रभाताईनी केला. त्यांच्या गाण्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप दिसून येते. भारतीय संगीत हा भारतापुरता मर्यादित नसून, ते वैश्विक संगीत आहे हा विचार प्रभाताईनी दिला. किराणा घराण्यामध्ये बंदिशी कमी आहेत, असे मानले जात पण प्रभा ताईनी ७०० बंदिशी तयार करून ही उणीव भरून काढली.’’
शास्त्रीय संगीताला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी संस्कार भारतीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे शास्त्रीय संगीत पर्यटन सुरु करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचेही डॉ. कशाळकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले, तर सुधाकर चव्हाण यांनी आभार मानले.