शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे – अंबादास दानवे 

बीड : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरु आहे.  मात्र मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल   बुलढाण्यात (Buldana Shiv sena News) शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट आमोरासमोर भिडले.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही (Buldana Lathi Charge) करावा लागला. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, हल्ला केलेले हे कार्यकर्ते शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे असल्याचा आरोप संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. त्यावर आमदार गायकवाड यांनीही हे आपलेच कार्यकर्ते असल्याचे मान्य करत या हल्लाचे समर्थनही केले. तसेच पुढच्या वेळी चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे, असे म्हणतं ठाकरे गटाला इशाराही दिला आहे.

दरम्यान, आता शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संजय गायकवाड यांना दिले आहे. संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चुन चुन के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल, असा इशारा त्यांनी गायकवाड यांना दिला आहे.