नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित – दानवे  

Mumbai – औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याची मागणी करण्यात येत होती.  आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव (Sharashiv) म्हणून ओळखलं जाणार आहे.

दरम्यान, हे ऐतिहासिक पाऊल आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. आठ महिन्यांपूर्वी युतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. तसंच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून याच मुद्द्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा देवेंद्र जी! असं दानवे यांनी म्हटले आहे.