नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न तुम्ही कशाला करताय? खोपकरांनी कायंदेंना सुनावले खडेबोल

Mumbai : शिवसेना (MLA Manisha Kayande) आमदार मनीषा कायंदे यांनी  मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेवर टीका केली आहे. (BJP-MNS) भाजप-मनसे युतीची चर्चा रंगली असून सत्तेसाठी किती ही लाचारी असं म्हणत त्यांनी मनसेवर टीका केली आहे. आता खऱ्या अर्थाने हिंदूत्वाचा (Hinduism) मुखवटा कशासाठी घातला हे देखील सर्वसामान्यांच्या लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीबाबत त्यांनी दोन्ही पक्षावर सडकून टीका केली असून हे सर्व सत्तेसाठी चालले असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

गरज निर्माण होईल अशी मनसेने आतापर्यंत आपली भूमिका बदलेली आहे. ही बाब आता सर्वसामान्यांच्याही लक्षात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हिंदूत्व मुद्द्याला हात घातला होता. हे सर्व कशासाठी ते आता लक्षात येत आहे. भाजप-मनसे युतीबाबतच्या घडामोडी ह्या अचानक नाहीतर खूप पूर्वीपासूनच्या असल्याची टीकाही कायंदे यांनी केली आहे. हिंदूत्वाचा मुखवटा कशासाठी घेतला होता हे गेल्या दोन दिवसांच्या हालचालीवरुन निदर्शनास येत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, कायंदे यांच्या या टीकेला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अहो मनिषाजी कायंदे, सत्ता बळकावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर लाचार झालेली शिवसेना जगाने पाहिलेली आहे. त्यामुळे नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न तुम्ही कशाला करताय. स्वतःची पात्रता नसताना वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी थेट राजसाहेबांबद्दल पातळी सोडून बोलणं तुम्हाला शोभत नाही. एवढीच टिवटिव करायची हौस असेल तर भाजप पक्ष का सोडला त्याचं खरं कारण लोकांना सांगा. असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.