लातूर जिल्हा कृषी विकास केंद्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी पायाभ्रूत सुविधा ऊभारणीवर भर देणार

लातूर – शैक्षणिक केंद्र म्हणून लातूरचा विकास होत असतानाच आता कृषी विकासाचे केंद्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी लातूर जिल्हयात पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी बोलतांना केले.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी औसा तालुक्यातील बेलकुंड माऊली नगर येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीमध्ये उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हा. चेअरमन श्याम भोसले, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, काँग्रेसचे अमर खानापुरे, कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, ट्वेंटीवन शुगर चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, बाबासाहेब गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, सचिन दाताळ, राष्ट्रवादीचे सुभाष पवार, बबन भोसले, सचिन पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, ऊसउत्पादक सभासद, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कारखान्याच्या निवडणूक काळात दिलेल्या आश्वासना प्रमाणे हा कारखाना सुरू करता आला, याचा मला मनस्वी आनंद आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्या पुर्वीच या कारखाना निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी ठरला आहे. संत शिरोमणी हा कारखाना पून्हा मांजरा परिवारात सामील व्हावा यासाठी आम्ही निवडणूक लढवावी असा आग्रह कारखाना सभासद व शेतकरी यांनी धरला होता. शेतकऱी सभासदाच्या आग्राहा खातर विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नावाने आपण पॅनल तयार केले यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही सोबत घेतले. लोकांनी प्रचंड मताधिक्क्यांने या पॅनलला निवडणूक दिले. मध्यतरी दुष्काळ आणि तांत्रीक कारणाने हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. महाविकास आघाडी सरकारने प्रोत्साहन देऊन हा कारखाना सुरू करण्यास परवानगी दिली. लातूर जिल्हा बॅकेचे पाठबळ मिळाले आणि हा कारखाना आज सुरू झाला आहे. सर्व ऊस्उत्पादक शेतकरी, कर्मचारी, कामगार यांनी हा कारखाना उत्तम चालेल यासाठी संयुक्त प्रयत्न करावेत. आमच्याकडून जे हवे ते सहकार्य करण्यात येईल असे  देशमुख यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेला हा कारखाना अत्यंत चांगला चालेल हा विश्वास असल्याचे सांगून आगामी काळात या कारखान्याची गाळप क्षमता वाढवली जाईल, वीज, इथेनॉल यासह इतर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभा करून कारखान्याला वैभव प्राप्त करून दिले जाईल असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले. राजकीय जीवनात काम करीत असतांना राजकारण निवडणुकी पुरते असावे ही शिकवण आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर आणि आदरणीय दिलीपराव देशमुख यांची आहे. त्यांची शिकवण कायम स्मरणात असल्यामुळे कारखाना कामाकाजात कोणतेही राजकारण न आणता. केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जाईल असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले.

लातूर जिल्हयात साखर कारखानदारी उत्तम सुरू आहे. ऊस व इतर कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. या उत्पादनाची साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी विशेष करून यावेळी बोलतांना म्हटले आहे.याप्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने चांगले काम करून जगात नाव कमावले आहे. लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आहे. मांजरा परिवाराने सहकार क्षेत्रात जिल्ह्यात मोठे काम केले आहे. आगामी काळातही हे काम असेच पूढे चालू राहील यात राज्यमंत्री म्हणून जे सहकार्य करणे शक्य् आहे ते केले जाईल असे आश्वासही यावेळी दिले.

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून औसा तालुक्यात हा कारखाना मंजूर केला. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची अल्पावधीत उभारणी झाली. प्रारंभी चांगला चाललेला हा कारखाना मध्यतरी काही कारणाने बंद राहिला. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वात निवडणूक झाले नंतर दिलेल्या आश्वासना प्रमाणे हा कारखाना सुरू होत आहे याच मनस्वी आनंद आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा लाभ मिळण्यासाठी या परिसरात कोजन, डिस्टीलरी हे प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे ते सुरू करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार सचिन पाटील यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर मातोळा व कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी बेलकुंड चा कारखाना सुरू केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून आभार मानले.