‘मराठी भाषा गौरव’ दिनी मनसेची मोठी घोषणा, अमित ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबादारी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकमुखी नेतृत्वात चालणाऱ्या मनसेने आता मोठे पाऊल उचलत अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबादारी देत मोठा निर्णय घेतला आहे.

अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची जबाबदारी देऊन मनसेला एक मजबूत पक्ष बनवायचा आहे. नुकतेच मनसेच्या विद्यार्थी संघटना आणि युवा संघटनेशी संबंधित अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. ही घसरण थांबवण्यासाठी आणि मराठी तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

मनसेने या संदर्भात एक अधिकृत पत्रक काढलं आहे. मनसेने या पत्रकात म्हटलं आहे की, ‘आज ‘मराठी भाषा गौरव’ दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे.’

आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद हे रिक्त होते. त्यामुळे या पदावर अमित ठाकरेंचीच नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी होत होती. अखेर आज अमित ठाकरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.