महानायक अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्यात यावा, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मागणी

कोलकाता: बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे सिनेसृष्टीतील योगदान मोठे आहे. याच अमिताभ बच्चन यांना भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारतरत्न (Bharatratna) देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banrjee) यांनी गुरुवारी केली. कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित 28 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन समारंभाला संबोधित करताना ममता बॅनर्जी बोलत होत्या.

महानायकाने चित्रपट महोत्सवाचे केले उद्घाटन
बिग बी अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी २८ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (KIFF) उद्घाटन केले. येथील नेताजी इनडोअर स्टेडियमवर अमिताभ यांनी दीपप्रज्वलन करून चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिनेत्री जया बच्चन, अभिनेता शाहरुख खान, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली, चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आदी उपस्थित होते.

चित्रपट महोत्सवादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या जीवन आणि कार्यांवर आधारित एक प्रदर्शन दाखवण्यात आले. त्याची सुरुवात ‘अभिमान’च्या परफॉर्मन्सने झाली. 16 ते 22 डिसेंबर दरम्यान शहरातील 10 चित्रपटगृहांमध्ये एकूण 183 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.