‘हनुमान चालीसाच्या दोन ओळीही राज ठाकरेंना म्हणता येत नाहीत’

 पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press confrance)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

दरम्यान,  राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी निशाणा साधला आहे. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, मात्र श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच हनुमान चालीसाच्या दोन ओळीही राज ठाकरेंना म्हणता येत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.