‘विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही, कारण…’;  अमोल मिटकरी यांचा दावा

मुंबई  :   राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी (BJP) व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून  गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान,  या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे करणार आहेत. मात्र शासकीय पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचं सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे. कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास मग सर्व काही समोर येणार आहे. मात्र भाजपच्या देवेंद्र फडणवीसांवर पांडुरंग का नाराज आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे,’ असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपचा मुख्यमंत्री करणार, असं सुचवलं होतं. परंतु आता विठ्ठलानं एकनाथाला बोलावलं. त्यामुळे आता सरकार नेमकं भाजपचं की शिवसेनेचं (Shivsena) आहे, याचं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावं, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.