“नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही नसलं की विरोधक बायकोच्या मागे लागतात”, अमृता फडणवीस यांचं मोठ विधान

Mumbai- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी (Devendra Fadnavis Wife) अमृता फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. राजकीय विषयांवर भाष्य करण्याबरोबरच त्या त्यांच्या गायनामुळेही (Amruta Fadnavis Song) चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे ‘अज मैं मूड बणा लेया ए..’ हे गाणे प्रदर्शित झाले असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु या गाण्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे.

ट्रोलिंगच्या प्रकारानंतर अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis On Trolls) ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्रोल करणारी लोक विरोधी पक्षातील असल्याचं सांगत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत, त्यांच्यावर बोलण्यासाठी विरोधकांकडे काहीही नाही, त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात, असं विधान अमृता फडणवीसांनी केलं. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही किंवा त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही. तेव्हा खूपदा त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. विरोधक तेच करत आहेत. त्यांनी माझ्या या गाण्यालाही सोडलं नाही, ते ठीक आहे. पण त्यांनी माझ्या भजनालाही ट्रोल केलं.”

“देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय पदामुळे हे केलं जातंय, हे मला माहीत आहे. आता मला ट्रोलिंगची सवय झाली आहे. मी सातत्याने माझं काम करत आहे, याचा मला आनंद आहे. माझ्या गाण्याला लोकांची पसंतीही वाढत आहे,” असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं.