‘हिंदू-मुस्लिम करणाऱ्या भक्तांच्या गालावर मामींची चपराक’! अमृता फडणवीस यांची रियाझ अलीसोबतची रिल चर्चेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्यांचे आज मैं मूड बना लेया ए… हे गाणे प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला दाद दिल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ अली (Reel Star Riyaz Aly) याच्यासोबत आज मूड बना लेया ए गाण्यावर रिल तयार केलं. दरम्यान, अमृता फडणवीस यांची ही क्लिप सध्या चांगलील चर्चेत आहे.

रिल स्टार रियाझ अली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ खुद्द अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या नव्या रिलची चर्चा आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. या रिलवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

काही युजर्सनी तर अमृता फडणवीस यांच्या रिलला हिंदू-मुस्लीम भेदभावाशी जोडत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलेय की, “हिंदू मुस्लिम करणाऱ्या भक्तांच्या गालावर एक जोरदार आवाज काढला आहे मामींनी. माणसाने असं बिनधास्त जगाव. धर्म धर्म ची पिपाणी वाजवणाऱ्या लोकांना चपराक आहे ही. धन्यवाद अमृता फडणवीस आणि रियाझ अली.” या रिलवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.