बच्चू कडू यांचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न? अमोल मिटकरी यांचा सवाल

अमरावती – चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू (mla bacchu kadu accident) यांचा अपघात झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी सकाळी घडला.

दरम्यान, बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडून हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का? असा संशय आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी व्यक्त केली होती. विस्तार करता येत नसेल तर करू नका. पण खोटं बोलू नका, असं बच्चू कडू म्हणाले होते. काल त्यांचाही अपघात झाला. हा अपघात झाला की याच लोकांनी घडवून आणला? याची चौकशी करण्याची मागणी मी केली आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

हा अपघात होता की सत्ताधाऱ्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न होता का? याची चौकशी झाली पाहिजे. जर असं राजकारण हे करत असतील महाराष्ट्रातील जनता 2024 ला या सरकारला सत्तेवरून खेचल्याशिवाय राहणार नाही. लोक वाट पाहून आहेत. लोकशाहीला पायदळी तुडवणारे हे लोक आहेत, अशी टीका मिटकरी यांनी केली.