छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित येणार पुस्तक; राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार

मुंबई – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री(Former Deputy Chief Minister) आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष(National President) छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांचा दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने छगन भुजबळ गौरव समितीच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(Nationalist Congress Party) राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार(Sharad pawar) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १.३० वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे समन्वयक खासदार प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

छगन भुजबळ गौरव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या अमृत महोत्सवी सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले,जम्मू – काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला, प्रज्ञावंत लेखक, कवी डॉ.जावेद अख्तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सावंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ७५ निवडक छायाचित्र पुस्तिका, फोटो बायोग्राफीचे देखील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात येणार आहे.

या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत. यामध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राज्यभर घेतले जाणार आहे. छगन भुजबळ गौरव समितीमध्ये समन्वयक खासदार प्रफुल पटेल यांचेसह काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन अहिर यांचा समावेश आहे.