अभिनेत्री अंकिता लोखंडेला कोणी देत नाहीये काम; व्यथा मांडत म्हणाली, ‘मी कामासाठी भीक मागणार..’

मुंबई- हिंदी टीव्ही सिरियल ‘पवित्र रिश्ता’मध्ये अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती, त्यानंतरच तिला खरी ओळख मिळाली. हे पात्र साकारल्यानंतर ती अर्चना नावाने घराघरात प्रसिद्ध झाली आणि रातोरात स्टार बनली. यानंतर अंकिताही चित्रपटांकडे वळली आणि ती बॉलिवूडच्या दोन मोठ्या चित्रपटांचा भाग बनली. अंकिता लोखंडेने ‘बागी 3’ मध्ये श्रद्धा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती, तसेच ती कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’मध्ये एका दमदार भूमिकेत दिसली होती, ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले होते. मात्र या दोन चित्रपटांनंतर अंकिता कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आता अनेक वर्षांनंतर अंकिताने यावर स्पष्ट वक्‍तव्य केले आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत अंकिताला याबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘लोक म्हणतात की मला चांगल्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. परंतु मला तर नकार देण्यासाठीही प्रोजेक्ट्स ऑफर करण्यात आले नाहीत.’ यासोबतच तिने हेही स्पष्ट केले की, ती अशी अभिनेत्री नाही की ती समोरून काम मागेल, त्यामुळे ती कधीच कामासाठी भीक मागणार नाही.