महाविकास आघाडीसमोर आणखी एक आव्हान; कसब्याची निवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार 

 Pune Bypoll Election: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसही लवकरच त्यांच्या उमेदवारांची नावे देईल अशी चर्चा सुरू होती. आता काँग्रेसने देखील त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देण्यासाठी काँग्रेसने कसब्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे.मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याचे चित्र आहे.मटाने दिलेल्या वृत्तानुसार,  रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने ग्रीन सिग्नल दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) हे बंडखोरी करण्याचा तयारीत आहेत.

दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. त्यांचा महाविकास आघाडीत समावेश नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीत उमेदवार दिला असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, पुण्यातल्या चिंचवड आणि कसबा पेठ या दोन विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने जो उमदेपणा दाखवला तसाच उमदेपणा आता महाविकास आघाडीने दाखवावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.