आणखी एक घोटाळा? आता प्रज्वला योजनेची होणार चौकशी

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रज्वला योजनेत गैरप्रकार झाला असेल तर, त्याबाबत स्वतंत्र चौकशी समितीद्वारे पडताळणी करण्यात येईल. तसेच समितीच्या अहवालानंतर सत्यता पडताळून दोषींवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

आज विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या प्रज्वला योजनेबाबत डॉ. मनीषा कायंदे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये प्रज्वला योजनेबाबत कॅगच्या अहवालात ओढले गेलेले ताशेरे, राज्य सरकारच्या प्रज्वला योजनेचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला गेला, आयोगाने आपल्या कार्यकक्षा ओलांडून वारेमाप खर्च केला गेला, जो खर्च केला गेला, त्याच्या हस्तलिखित कच्च्या पावत्या सादर केल्या गेल्या. कॅगच्या अहवालानुसार सर्व २८८ विधानसभा मतदार क्षेत्रात कार्यक्रम करणे आवश्यक होते, मात्र फक्त ९८ क्षेत्रात कार्यक्रम झाले. त्यामुळे या योजनेची चौकशी करण्याची मागणी सन्मानीय सदस्यांनी केली. त्याला उत्तर देताना ॲड. ठाकूर यांनी स्वतंत्र समिती नेमून याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. शिवाय या योजनेत कोणत्याही शासन निर्णयाशिवाय तसेच कोणत्याही अधिकृत प्रक्रियेशिवाय अनेक निर्णय घेतले गेले, ही वस्तुस्थिती असल्याचे ॲड. ठाकूर यांनी स्पष्ट केले.

मागच्या सरकारच्या काळात राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून प्रज्वला योजना राबविण्यात आली होती. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात या प्रज्वला योजनेचा शुभारंभ नंदुरबारमधून झाल्यानंतर जळगाव, नाशिक असे केवळ ९८ विधानसभा मतदार क्षेत्रात बचत गटातील महिलांचे मेळावे पार पडले होते.