महाविकास आघाडी नेत्याचा आज आणखी एक घोटाळा उघडकीस येणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे माजी खासदार किरीट सोमय्या बाहेर काढत असून आता सोमय्या यांच्यावरच घोटाळा केल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांचे घोटाळे बाहेर काढले जात असताना आता आणखी एक घोटाळा आज बाहेर येणार आहे.

महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.

सोमय्या म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे बोलताना उद्धव साहेब उद्या तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तसेच, घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.