संयुक्त खतातून पिकांना योग्य मात्रेत खत द्यावे

लातूर :- जिल्ह्यात खरिप हंगामातील पिकाची काढणी पूर्ण झालेली असून, रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू, करडई, भुईमूग पिके आहेत.रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्हयात उपलब्ध् आहेत. परंतू बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डिएपी खताच्या वापराकडे दिसून येतो.

त्यामुळे बाजारात डीएपी खताची मागणी वाढली आहे. उपलब्ध् संयुक्त खतामधून सुध्दा पिकांच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खतांचा आग्रह न धरता संयुक्त खतांतून पिकांना योग्य मात्रेत खत द्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केली आहे.

बाजारात 10:26:26, 15:15:15, 12:32:16 आणि 20:20:0:13 ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध् आहेत. तसेच सिंगल सुपर फास्फेट, म्युरेट आफ पोटॅश, 24:24:00 ही खते देखील उपलब्ध् आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करताना वरील संयुक्त खते द्यावीत, असेही आवाहन कृषि विभागाने केले आहे.