तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता- चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालये/संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय :
कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.625 वरुन रु.1 हजार प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.750 वरुन रु. 1 हजार प्रति तास.
शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. 750 वरुन रु.1 हजार प्रति तास.

तंत्र शिक्षण संचालनालय :
उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. 1 हजार वरुन रु. 1 हजार 500 प्रति तास.
पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. 600 वरुन रु. 1 हजार प्रति तास.
पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 वरुन रु.800 प्रति तास.

कला संचालनालय :
उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 वरुन रु.1 हजार 500 प्रति तास.
कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 वरुन रु.1 हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.