नवी दिल्ली- शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भर पडण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते समजले जात होते. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाने दिलेल्या माहितीनुसार, जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर (Former MLA Arjun Khotkar) यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकरून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सूरु केली आहे. त्यामुळे त्यांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राहुल शेवाळे, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित होते.