जसा बाप तसा मुलगा! अर्जुन तेंडूलकरचे रणजी पदार्पणात शतक, वडील सचिनच्या विक्रमाची बरोबरी

गोवा| भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याने बुधवारी (१४ डिसेबर) त्याच्या वडिलांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अर्जुनने राजस्थानविरुद्ध गोवा संघाकडून रणजी पदार्पण करत शतक झळकावले आहे. यासह त्याने सचिनच्या रणजी पदार्पणात शतक ठोकण्याच्या उल्लेखनीय विक्रमाची बरोबरी केली आहे.

अर्जुनने राजस्थानविरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले. गोवा संघाकडून आपल्या कारकिर्दीतील पहिला रणजी सामना खेळताना त्याने शानदार फलंदाजी केली. ५२ चेंडूत षटकारासह त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर १७८ चेंडूत त्याने शतक पूर्ण करत इतिहास रचला. १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने शतक (Arjun Tendulkar Century) पूर्ण केले. अजूनही तो मैदानावर तुफान फटकेबाजी करत आहे.

रणजी पदार्पणात शतक करत अर्जुनने त्याचे वडील सचिनच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याने रणजी पदार्पणात शतक करण्याच्या विक्रमात सचिनची बरोबरी केली आहे. सचिनने ११ डिसेंबर १९८८ ला मुंबईकडून गुजरातविरुद्ध रणजी पदार्पणाच्या सामन्यात शतक केले होते. १५ वर्षे २३१ दिवसांचा असताना सचिनने हा पराक्रम केला होता. तर आता अर्जुनने २३ वर्षे ८१ दिवसांचा हा विक्रम केला आहे.