उस्मानाबाद – युध्द पातळीवर कॅबिनेटची बैठक घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज उस्मानाबाद येथे केली आहे. संभाजीराजे छत्रपती हे आज उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. जिल्ह्यातील रामवाडी येथे त्यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना आधार दिला आहे. सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा,राजोरी, दाऊतपूर , इरला, काजळा येथील नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामध्ये इरला गावातील बालाजी वसंत कांबळे हे तरूण दहा दिवसांपूर्वी वाहून गेले व अद्यापही ते बेपत्ता आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या कुटूंबीयांस भेट देऊन त्यांना धीर दिला. घरातील कर्त्या मुलावर अशी परिस्थिती ओढवल्याने वृद्ध आई वडील खचून गेले आहेत. घरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. याबाबत त्यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या कुटूंबास धीर देण्यासाठी तात्काळ मदतीची तरतूद करावी, अशी सूचना केली.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.आज उस्मानाबादमधून पाहणी दौऱ्यास जात असताना सुध्दा प्रचंड पाऊस सुरू आहे.सलग दुसऱ्या वर्षी हाताशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल आहे.रस्त्यावरून जात असतानाही शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानाची दाहकता जाणवत आहे. pic.twitter.com/x5jtQgZKt4
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 6, 2021
दरम्यान, शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला. यानंतर आता राज्यसभेचे भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाहणीकरिता येत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी एक ट्विट करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची दाहकता रस्त्यावरूनही समजत असल्याचे सांगितले आहे.