पवारांच्या आयुष्यातला पहिला मोर्चा अन् विखे पाटील म्हणाले, ‘मी माझा कारखानाच बंद करतो’

अहमदनगर : पवार आणि विखे हे दोन परिवार महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरफुल परिवार म्हणून ओळखले जातात. पवार आणि विखे कुटुंबातील संघर्ष तसा फार जुनाये. राज्याच्या राजकारणात नेहमीच शरद पवार विरूद्ध विखे असं चित्र राहिलं. राज्यातील या दोन बड्या नेत्यांच्या संघर्षाच्या अनेक कहाण्या आजवर महाराष्ट्राने पाहिल्यात. पण या संघर्षाची खरी सुरवात ही शरद पवारांच्या आयुष्यातील पहिल्या मोर्चाने झाली होती. नमस्कार मी अभिजीत आणि तुम्ही पाहायला सुरवात केल आहे.

यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले. शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांचा विरोधी गट मानला जायचा. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटालाच असायचा. बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यातील हा वाद १९९१च्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला.

अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला. नंतर या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना तब्ब्ल सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं.

पण पवार-विखे हा संघर्ष खरा सुरु झाला होता तो शरद पवार यांच्या आयुष्यातील पहिल्या मोर्चातच म्हणजेच १९६०च्या दशकात. ही त्याच वेळेची गोष्ट आहे ज्या वेळी शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे विखे पाटलांच्या प्रवरानगर सहकारी साखर कारखान्यात कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. दुसरीकडे शरद पवारांचे लक्ष शिक्षणेतर अन्य गोष्टीत जास्त असल्याने त्यांची रवानगी प्रवानगरला झाली कारण होते अप्पासाहेबांच्या नजरेखाली राहावेत.

याचं ठिकाणी शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील पहिला मोर्चा काढला. त्याच झालं असं की त्यावेळी ‘गोवामुक्ती’ची चवळवळ सुरु होती. १९५४ पासून या चळवळीला विशेष गती मिळाली. गोव्याचं शांततापूर्ण हस्तांतरण व्हावं यासाठी सत्याग्रहींनी गोव्यात प्रवेश करण्याचं ठरवलं. त्यानुसार ऑगस्ट १९५५ मध्ये सेनापती बापट, महादेवशास्री जोशी, नानासाहेब गोरे, सुधीर फडके इत्यादींच्या नेतृवाखाली अनेक तुकड्या गोव्यात शिरल्या. भारत सरकारने १८ डिसेंबर १९६१ला आपल्या लष्कराची १७वी तुकडी वायुदल आणि नौदलासह गोव्यात पाठवली. सर्व बाजूंनी गोव्याची नाकाबंदी करण्यात आली होती. सुमारे २६ तासांच्या आतच पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आली.

मात्र तत्पूर्वी पोर्तुगीजांनी सत्याग्रहींच्या विरोधात अमानुष वागण सुरूच ठेवलं होतं आणि त्यात पोर्तुगीजांच्या गोळीबारात अहमदनगर जिल्ह्यातील तुळशीदास बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरजी हुतात्मा झाले. वर्तमानपत्रात ही बातमी वाचताच शरद पवारांनी विद्यार्थ्यांची जमवा-जमव केली आणि या घटनेच्या निषेधार्थ शाळा बंद पाडली. एवढ्यावरच थांबतील ते पवार कुठले लागलीच सहाशे-सातशे विद्यार्थी बरोबर घेऊन त्यांनी एक मोर्चा काढला. वाटेत येणारी बाजारपेठ देखील या मोर्चाने बंद पाडली. त्यानंतर हा मोर्चा थेट साखर कारखान्याच्या दिशेने निघाला. याच ठिकाणी शरद पवार आणि विठ्ठलराव विखे पाटील यांच्यात सामना झाला.

विखे पाटील पवारांना म्हणाले ‘बंद कशासाठी ?’ पवारांनी झालेली घटना विखे पाटलांना सांगितली आणि त्याच्या निषेधार्थ बंद पाळावा अशी आमची भूमिका असल्याचे देखील सांगितले. विखे पाटलांनी शरद पवारंना विचारलं ‘बंद पाळून गोवा भारतात कसा विलीन होणार ?, अन बंद पाळल्याने जर गोवा भारतात विलीन होणार असेल तर मी माझा कारखाना कायमस्वरूपी बंद करायला तयार आहे.’ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या या उत्तराने शरद पवार आणि मोर्चेकरी विद्यार्थी निरुत्तर झाले. आणि खुद्द पवारांना विखे पाटलांच्या या उत्तराने कोणत्याही कृतीमागे तार्किक विचार कसा हवा, याचा मोठा धडा मिळाला.